चित्रकर्त्री आत्मजा – परिचय शिक्षण – G. D. Art, ढोणे चित्रकला महाविद्यालय, अकोला Dip. A. Ed., भारती विद्यापीठ, पुणे मी कोण आहे, या विश्वाचा कर्ता कोण आहे, त्याचा आणि माझा काय संबंध आहे, या विश्वाचा आणि माझा काय संबंध आहे, मानवी जीवनाचे खरे उद्दिष्ट-शाश्वतसुख व कृतार्थ जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव देणारे संतांचे विचारधन म्हणजेच आत्मज्ञान होय. श्रीमद्भगवद्गीता, श्रीज्ञानेश्वरी, श्रीतुकाराम गाथा यांतील दिव्य जीवनस्पर्शी विचारांनी स्वतःचे जीवन घडविण्यास प्रयत्नशील असणार्या आत्मजाने गेली आठ वर्षे अथक परिश्रम घेत अनेक चित्रे काढली आहेत. ती श्री संत सेवा संघामार्फत विविध नामांकित प्रदर्शनस्थळांतून, महाविद्यालयांतून प्रदर्शित केली जात आहेत. श्री संत सेवा संघ ही संस्था गेली १४ वर्षे संतांच्या व छत्रपती श्रीशिवरायांच्या विचारांप्रमाणे जगणारे जीवनव्रती घडावेत, याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. संस्थेचे श्रीज्ञानेश्वरी पाठ्यक्रम प्रकल्प, निःशुल्क निवासी ज्ञानप्रबोधन शिबिरे, साप्ताहिक चिन्तन वर्ग, श्रीज्ञानेश्वरी आध्यात्मिक साधना केंद्र, स्तोत्रे-अभंग-ओव्यांच्य सी. डी.ज्, तरुणांकरिता-शिक्षकांकरिता व्याख्यानमाला, आदि विविध प्रकल्प सातत्याने सुरू आहेत. या माध्यमांतून सुमारे ३,००० तरुण-तरुणी संतविचारांशी जोडले गेले आहेत. याच समर्पित पिढीची प्रतिनिधी असलेली आत्मजा! (पूर्वीची रेणू पांडे) तिच्या हातून भक्ति-ज्ञान-योगमार्गातील सिद्धांत, संतांचे जीवनदर्शी विचार यांवर आधारित ६० चित्रे आकारास आली. विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील आत्मजाने चित्रांच्या माध्यमातून तत्त्वज्ञानाचे आविष्करण करून संतविचारांच्या प्रसारार्थ एक अभिनव माध्यम उपलब्ध करून दिले आहे. आत्मजाविषयी सांगण्याची विशेष बाब म्हणजे लक्षावधी रुपये किंमत असणारी ही सर्व चित्रे आत्मजाने श्री संत सेवा संघाच्या ज्ञानप्रसाराच्या कार्यासाठी संस्थेला – संस्थेतील जीवनव्रती कार्यकर्त्यांना निष्कामपणे समर्पित केली आहेत. चित्रकलेचे शिक्षण घेतल्यानंतर काही काळ मराठी चित्रपटसृष्टीत कला-दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या आत्मजाला पूर्वीपासून व्यक्तिचित्रण व निसर्गचित्रणाची आवड होती. चित्रपटसृष्टीत काम करीत असताना त्यावेळी कॅमेरामन म्हणून काम करणारे तिचे आध्यात्मिक गुरु पूजनीय श्रीसंजयगुरुजी (संस्थापक – श्री संत सेवा संघ) यांच्याशी ओळख झाली. “त्यांच्याकडून श्रीज्ञानेश्वरीचा, संतांचा तत्त्वदर्शी विचार मिळाला व माझ्या जीवनाला खरी दिशा मिळाली,” असे आत्मजा सांगते. आत्मज्ञान चित्रमालिका यापूर्वी १. बालगंधर्व कलादालन (पुणे), २. कालिदास कला मंदिर (नाशिक), ३. विश्व शांतता परिषद, ४. माईर्स MIT (पुणे), ५. स. प. महाविद्यालय (पुणे), ६. COEP (पुणे), ७. BYKC (नाशिक), ८. हिंदुजा हॉस्पिटल (मुंबई), ९. गरवारे कॉलेज (पुणे), १०. कृषि महाविद्यालय (कोल्हापूर), ११. हिंदु धर्म संस्कृती मंदिर (नागपूर), १२. प्रमिलाताई ओक हॉल (अकोला), १३. रोटरी क्लब ऑफ नाशिक, १४. कोकण कृषि विद्यापीठ (दापोली), बारामती, फलटण, इचलकरंजी, अकलूज, नांदेड, पंढरपूर अशा विविध ठिकाणी उदंड प्रतिसादासह प्रदर्शित झाली आहेत. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, ह. भ. प. बंडातात्या कर्हाडकर, ज्येष्ठ प्रवचनकार सौ. कल्याणीताई नामजोशी, अभिनेते रमेश देव, चित्रकार रवि परांजपे, शिल्पकार राम थत्ते, शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर, अड. मकरन्द आडकर (सर्वोच्च न्यायालय), शिवशंकरभाऊ पाटील (श्री.सं.ग.म.सं., शेगाव) अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आत्मजाच्या कलेस व तिच्या समर्पित वृत्तीस गौरविले आहे.