!! आपली सातारी भाषा !!
मराठी भाषा दिन विशेष लेख -
पुणे आणि कोल्हापूर या दोन शहरांमध्ये असलेल्या सातारच्या बोलीचा ढंग वेगळ्या स्वरूपाचा आहे. सातारा जिल्ह्यातील काही शहरे वगळता जिल्ह्याचा तोंडवळा ग्रामीण आहे. सातारी ग्रामीण बोलीचे वेगळेपण तिच्या नसानसांत भरले आहे. ही भाषा रगेल आहे. रासवट आहे आणि रंगेलही आहे. तिच्यातील अस्सल दमदारपणा हीच तिच्यातील ताकद. शहरी लोक या भाषेतील शब्दांचा हमखास वापर करताना दिसतात.
‘ऐकणाऱ्यानं ऐकत रहावं आणि भुलणाऱ्यानं भुलून जावं,’ असा ‘बाजिंदा बाज’ या बोलीला आहे. इथे पालीच्या खंडोबाची मुरळी नाचायला लागली, तर तिच्या हातातील पितळी घंटीसुद्धा ‘वयात आल्यासारखी खणखणू’ लागते. इथे माणसे इरसाल बोलतात. एखाद्याला दम देताना ‘वांगं वासाय लावीन’ असं म्हणतात. कुऱ्हाडीला दांडा ठोकणारा टग्या गावाला आव्हान देताना म्हणतो, ‘न्हाय गावाच्या मणक्यात खिळा ठोकला तर पाराव बसून गावाच्या मुतात दाढी करीन’. सातारी माणसं बोलताना निभ्रत उच्चार करतात. उदा. ‘आले’ असं न म्हणता ‘आलं’ म्हणतात. वारं, गेलं, मेलं, झालं असे निसटत्या उच्चारांचे शब्द या बोली भाषेत येतात. अनेक शब्दांत शेवटचा ‘र’ गायब होतो. उदा. ‘फांदीव’, ‘घराव’, ‘अंगाव’, ‘गावाव’, ‘डावाव’ असे शब्द रोजच्या उच्चारात येतात. मनगटाच्या जोरावर गावात दहशत निर्माण करणारा माणूस ‘मुस्काट पाडीन’, ‘फासून मारीन’, ‘रगात वकाय लावीन’ असं सहज म्हणतो. एखाद्या बाईचं मूल वेड्यासारखं करायला लागलं तर ती म्हणते, ‘रामा, असा का भंजाळल्यागत करतुया?’, पोरगं पळालं तर म्हणतात, ‘भुंग्यागत भुंगाट गेलं’, शेतात खपणाऱ्या शेतकऱ्याला दुसऱ्या शेतकऱ्यानं जेवता जेवता हाक मारली तर हसत हसत म्हणतो, ‘महादेव म्हणा नि तीन हाणा.’
राबणाऱ्यांची भाषा चित्रमय शैलीत व्यक्त होते. एका सुंदर मुलीचं वर्णन करताना माझी आई म्हणाली, ‘पोरगी कशी गोरी गोरीपान... दुधातनं वैरून काढल्यावाणी. हसली मजी मोतीचुऱ्याचं कणीस वाऱ्याव हेंदकळल्यागत वाटतं.’ फार सुंदर उपमा देतात लोक. पोरीचं लग्न ठरवायला निघालं की बायका सुंदर वाक्प्रचारांचा उपयोग करतात. म्हणतात, ‘उगं हूलहूल करू नका. जागा यवस्थित चोखळून बघा. गंज बघून गाय बांधा’. या ग्रामीणांच्या ओठातील बोलीभाषेमागे अनुभवाचं प्रचंड भांडार उभं असतं. बहीण-भावाचं भांडण सोडविताना अनुभवी म्हातारी म्हणते ‘भणीभावांडं का भांडताय? चिखलाला पाणी कवा तुटलंय का?’ मुलाला मुलगी अनुरूप असावी हे सांगताना ‘सोन्याची भित सोन्यानं सारवावी’ असं म्हणतात.
काही बेफिकिर माणसं ‘याची टोपी त्याला घालतात’ नि वर म्हणतात, ‘साळ्याचं वासरू नि माळ्याची गाय. जायनाका बोंबलत कुठं बी.’ चोरटं पोरगं घरात आलं तर म्हातारी म्हणते, ‘सावध ऱ्हावारं त्येच्यापास्नं. बघता बघता डोळ्यातलं काजाळ काढतंया. या हाताचं त्या हाताला कळत न्हाय.’ आपले काम झाल्यावर पैसे द्यायला नकार देणारा माणूस म्हणतो, ‘आता काय हाय माझ्याजवळ? हारभरं खाऊन हात झाडल्यागत सगळं मोकळंच की.’ दोन लबाड नातवंडं आजीजवळ एकमेकांबद्दल तक्रार करत होती. आजी म्हणाली, ‘काय बोलू नका. साधू सांगे म्हादूची पर नि हाराळी निघाली कुंद्याच्या वर.’
सातारी बोलीभाषेत हुमणांचा सुळसुळाट आहे. हुमण म्हणजे कोडे. ही ग्रामीण भाषेतील कोडी चमकदार असतात. त्यात बौद्धिक चमक असते. चांदण्या रात्री पूर्वी आयाबाया, मुले, मुली, म्हातारी माणसं धाबळी पांघरून एकमेकांना ‘हुमणं’ घालत. डोक्याला डोकं भिडवून उत्तरे शोधत. असे काही हुमणे आणि त्यांची उत्तरे कंसात दिली आहेत. त्यातील गंमत पुढीलप्रमाणे- आधी लाल लाल, मग गोल गोल, मग थय्यक थय्यक. (मिरच्या, खल आणि बत्ता), तळ्यात ना खळ्यात, उसाच्या मळ्यात, मामीच्या झिपऱ्या मामाच्या गळ्यात. (उसावर चढणारा बेलघेवडा), आई आई विहीर बघ. विहिरीला पाणी बघ. पाण्याला वेल बघ. वेलाला फूल बघ. (दिवा), मधाच्या राखणीला पिटुकल्याची राखण. (मधमाशी), येवढंसं कार्ट चटणी किती खातं? (वांगे), येवढंसं कार्ट घर कसं राखतं. (कुलूप), पांढऱ्या देवळाला वाटच न्हाय. (अंडे), पावणं आलं, गडबड झाली, झिपरी पोरं कुठं गेली? (केरसुणी), कोकणातनं आल्या आयाबाया, त्यांच्या खरबुड्या ठुया. (खारीक), खाली हाडूक. वरती झुडूप. (मुळा), म्हातारा उठला. करगुटा तुटला. (भोपळा), सूपभर लाह्या. त्यात एकच रुपया. (चंद्र आणि चांदण्या).
सातारा बोली भाषेत म्हणींचं भांडार आहे. अपरात्री बोंबलणाऱ्या माणसाला बायका म्हणतात, ‘येळ ना वखत नि गाढव चाललं भुकत’. खालमुंडी लबाड सून दूध सांडते नि थोरल्या जावेवर आळ घेते तेव्हा अनुभवी म्हातारी म्हणते, ‘गरीब गायीनं मोडला गोठा. अवखळ गायीचा बोभाटा मोठा’. बेनवाड, कामचुकार पोराला बाप म्हणतो, ‘जेवायला आधी. कामाला न्हाय कधी आणि झोपायला मधी’ असं हाय तुझं. आम्ही भावंडे मधाचं मोहोळ काढायला निघालो की आई म्हणायची, ‘निघाला का गाव उठवायला?’ माझा थोरला भाऊ कुठं कामासाठी बाहेरगावी जातो म्हणाला की आई म्हणायची, ‘तू नगं जाऊ. तुझं कसाय, चिमणी गेली ववळायला नि दिवस आला मावळायला.’ जेवणं झाल्यावर एखादा पाहुणा आला की माणसं म्हणणार, ‘खळं उलगडल्याव आलाय व्हय बलुतं मागायला? तुमचं कसैय पावणं स्वाँग आलं सजून नि रात गेली सरून.’
सातारी माणसं स्पष्टवक्ती असतात. तितकीच ती तिढ्यात बोलतात, तिरकस बोलतात. शिकलेला माणूस गावाकडे गेला की म्हाताऱ्या आबाला विचारलं, ‘काय आबा, बरं हाय का?’ तर आबा लगेच विचारतो, ‘तुला कसं दिसतंय?’ आमच्या कोरेगावच्या बाजारात एक बाई कोथिंबिरीच्या ढिगाशेजारी रुपायाचा ढीग लावून बसली होती. मी म्हटलं हे पाच रुपये घ्या नि एक पेंडी द्या. म्हातारी म्हणाली, ‘सुट्टा रुपाया दे’. मी म्हटलं हा ढीग कशाला लावलाय रुपयांचा?’ तर म्हणाली, ‘मला या ढिगात पुरून घ्यायचंय’. आता काय बोंबलायचं चुना घालून?
सातारी बोलीभाषा कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करते. उदा. बोंबलभिक्या- काम न करता भीक मागत जगणारा. झेंगाट- नसते उपद्व्याप. खेंगटं- डोक्याला त्रास देणारी घटना. पोरगी घरात चपात्या करते म्हणाली तर आई म्हणते, ‘मापट्याचा उंडा नि गावभर लाटणं धुंडा’ सांगितलंय कोणी?’ सातारी बोलीभाषेने प्रचंड शब्दधन मराठी प्रमाणभाषेला दिलं. उदा. सरमाड, भसका, निगाड, दुबलाक, व्हंडगाळ, मरतुकडं, लामडं, खुडूक, भुडुक, चिंगाट, बुंडुकलं, टरमाळ्या, गुंडगी, सकरात, भडभुंज्या, छप्पन टिकली, कातण, पुंगाणी, रगातपिती, फेगडं, सुगडं, लोटकं, फणी, काचकवड्या, पेंडार, भिरकं, सुताडगुताड, हेळकं, पिपाणी, चिकाटढ्याण, गारइच्चू, उनजाळ, मुतवणी, चिटुरं, गिन्नाड, फतकाल... असे अनेक शब्द आहेत.
अशी ही सातारी बोली भाषा सर्वगुणसंपन्न. दुर्दैवानं तिला मराठी चित्रपटसृष्टीत सन्मानाचे स्थान मिळाले नाही. (व्यंकटेश माडगूळकर आणि अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावरील काही चित्रपट याला अपवाद.) सध्या काही मालिकांमधून ही बोली दिसते आहे. दृकश्राव्य माध्यमांनी या सातारी बोलीची दखल घ्यायला हवी, त्यातील गंमत उलगडून दाखवायला हवी.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.) सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स