हिमालयाच्या सावलीत.. हिमाचल म्हटल्यावर सर्वात आधी जोडी आठवते ती शिमला-मनाली. सूर्य डोळे वटारू लागला आणि पारा चढू लागला की भटक्यांची पावले उत्तर भारताकडे वळतात. भारताच्या पूर्वेपासून ते उत्तरेपर्यंत पसरलेल्या हिमालयाच्या कुशीत वसलेले एक सदाबहार आणि सुपरहिट राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश. सतलज, रावी, बियास, स्पिती, चम्बा अशा नद्यांनी सुजलाम् सुफलाम् झालेल्या, पर्वतांच्या माथ्यावर बर्फाचे मुकुट मिरवणाऱ्या आणि सूचिपर्णी अरण्याची हिरवाई धारण केलेल्या या राज्यातील पर्यटन म्हणजे मनमोहन देसाई किंवा डेव्हिड धवनच्या फुल्ल टू मसाला चित्रपटासारखा दिल खूश करणारा अनुभव.. हिमाचल म्हटल्यावर सर्वात आधी जोडी आठवते ती शिमला-मनाली. अगदी शंकर-जयकिशन किंवा धरम-हेमासारखीच हीसुद्धा एव्हरग्रीन जोडी. साधारणत: सहा ते आठ दिवसांत तुम्ही शिमला-मनालीची सहल करू शकता. चंदिगड, दिल्ली-आग्राही पाहता येते. उन्हाळ्यात जाणार असाल तर विमानाने चंदिगढ गाठून शिमल्याहून सुरुवात करावी. शिमल्याकडे येण्याचा एक झक्कास पर्याय म्हणजे कालका-शिमला पहाडी रेल्वे. १०० वर्षांपूर्वी सुरू झालेली ही टॉय ट्रेन आजही त्याच रुबाबात धावते. ७,८६४ फुटांवर सात टेकडय़ांच्या माथ्यावर वसलेले शिमला ब्रिटिशकाळात भारताची उन्हाळी राजधानी होते. तो रुबाब आजही इथल्या व्हॉइसरॉयचा बंगला, ख्राइस्ट चर्चसारख्या दगडी वास्तूंमधून दिसतो. मॉल रोडवर फिरत स्कँडल पॉइंटवर जाणे जसे अनिवार्य आहे तसेच जवळच्या चैल येथील पतियाळाच्या महाराजांच्या पॅलेसला, सर्वात उंचावरच्या क्रिकेट ग्राऊंडला, कुफ्रीतल्या हिमालयातील प्राणीसंग्रहालयाला भेट देणेही आवश्यक आहे