९१वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन पुढील आठवड्यात बडोदा येथे संपन्न होणार आहे. ते भव्य होणार यात संदेह नाही, पण या भव्यतेत साहित्याचे काय होणार हा अनेक वर्षे विचारला जाणारा प्रश्न आजही कायम आहे. त्याची पुन्हा एकदा चर्चा करणारा हा लेख. सोबत मराठी साहित्याच्या विविध प्रांतात आज काय घडते आहे, याचा परामर्ष घेणारेही लेख देत आहोत ‌खिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंबंधी लिहिताना महात्मा जोतिराव फुले यांनी ग्रंथकार सभेस लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आज जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणून ओळखले जाते, ते सुरू होऊन १३३ वर्षे झाली आणि संमेलनाच्या संख्येनेही नव्वदी पार केली आहे. एवढी प्रदीर्घ वाटचाल झाली असतानाही संमेलनाच्या आवश्यकतेसंदर्भात प्रश्न विचारले जातात. जोतिरावांनी पहिल्या संमेलनावेळी विचारलेले प्रश्न जिथल्या तिथे आहेत, त्यानंतर काळाच्या प्रवाहात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि अशा कोणत्याही प्रश्नांना भिडण्याचा साधा प्रयत्नही संमेलनाने केलेला नाही. महाराष्ट्राच्या साहित्य-संस्कृतीचा प्रमुख सोहळा मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची चर्चा खूप होते. साहित्य-कला-संस्कृतीच्या क्षेत्रातल्या सगळ्या लोकांचे त्याकडे लक्ष असते, राजकीय नेतेसुद्धा त्या मंचावर जाण्यासाठी उत्सुक असतात. प्रसारमाध्यमांमधून त्याला मिळणारी जागा तुलनेने भरपूर असते. असे सगळे असूनसुद्धा मराठी माणसांना संमेलनाबद्दल आस्था, आत्मीयता वाटायला पाहिजे ती वाटत नाही.