अरुण लाड यांचा जन्म 29 ऑक्टोबर रोजी सांगली जिह्यातील पलूस तालुक्यातील कुंडलच्या सामाजिक कार्यकर्त्या शेतकरी कुटुंबात व येलूर (ता. वाळवा) या आजोळी झाला. सातारा प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे फिल्डमार्शल क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड हे त्यांचे वडील तर क्रांतिवीरांगना विजयाताई लाड या त्यांच्या आई होत. अरुण लाड हे लहानथोरामध्ये अण्णा या जनसामान्यातील नावाने सुपरिचीत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंडल (सांगली)च्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण कुंडलच्याच प्रतिनिधी हायस्कूल मधून पूर्ण झाले. त्यांनी कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथून बीएस्सी (कृषी) पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता उत्तम शेती व समाजकार्य करणे पसंत केले.